Monday, March 17, 2008

घटका, पळें...यक्षप्रश्न...झिरो पॅडिंग...असंबद्ध

एक चिवित्र घड्याळ. वेळ, जगाची लोकसंख्या, जन्म, मृत्यू...एवढंच नाही तर पृथ्वीचं वाढतं तपमान, घटणारी जंगले, वापरलं जाणारं खनिज तेल इ. दाखवणारे. दर सेकंदाला एक लग्न, एक गर्भपात आणि एक पंचमांश घटस्फोट होतो, ही माहिती(!) देणारं.

http://www.poodwaddle.com/clocks2.htm

हे लिहायला जेवढं वेळ लागला तेवढ्यात पन्नासेक जन्म, वीस-बावीस मृत्यू, थोडे अपघात, डझनावारी लग्नं, चार-पाच घटस्फोट,एक कॅन्सरग्रस्त, एखाद-दुसरी आत्महत्या इ. झाल्यात ही डिप्रेसिंग बातमी देणारा एक अजून ’नाऊ’ लिहिलेला टॅब.

ppp

युधिष्ठिराला ’जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?’ ह्या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक होतं (कठीण प्रश्नाला मराठीत आपण यक्षप्रश्न म्हणतो, ते यामुळेच). "जगात रोज अनेक मृत्यू आजूबाजूला पाहत असतानाही आपण अमर आहोत अशाच आविर्भावात माणसे जगतात", हे त्याचं उत्तर. इतर चार भावांना न आलेलं. कदाचित हे घड्याळ पाहून त्यांना सुचलं असतं, या प्रश्नाचं उत्तर. पण उत्तर माहीत नसल्याने बहुतेक ते अधिक सुखी असावेत. अज्ञानात सुख असतं तसं.

पण, सरसकट त्यांना अज्ञानी म्हणायला जीभ रेटत नाही. जग कितीही मोठं असलं तरी आपलं विश्व बव्हंशी आपल्यापुरतंच असतं. त्या अर्थाने दृष्टी थोडी मर्यादित ठेवावीच लागते. ’चिंता करतो विश्वाची’ हे रामदासांनीच म्हणणं ठीक. आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि ताऱ्यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच. इट्स अ वंडरफुल लाईफ मध्ये ख्रिसमस इव्हला आत्महत्या करायला निघालेल्या जॉर्ज बेलीला देवदूत येऊन त्याचं आयुष्य अगदीच वाया कसं गेलेलं नाही हे दाखवतो, तसं काहीसं. अर्थात, हे कधीकधी अगदीच फील-गुड होतं, हा भाग वेगळा.

पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बऱ्याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी. अर्धा भरलेल्या प्याल्याचं रुपक काय किंवा ’सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणत?’ काय - हे ओव्हर-सिम्प्लिफाईड वाटतं. म्हणजे सतत कोणी आशावादी गाणं म्हणणारा वगैरे राहिला, तर बोअर नाही का होणार?

वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतं म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार. डीएसपी म्हणजे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये एक झिरो पॅडिंग म्हणून संकल्पना आहे. दोन विरुद्ध टोकाच्या माहितीत शून्ये भरायची. [१,०,०,-१,०,०,०,०,१....] असं. शून्य = टोकाच्या दृष्टिकोनाचा किंवा एकंदरच अभाव, असं मानलं तर मग ही मालिका -- बराच वेळ काहीच न घडणारी, क्वचित वर-खाली होणारी -- हेच वास्तवाचं ’वास्तव’वादी वर्णन होऊ शकेल का? की हा आयुष्य सूत्रात बसवण्याच्या अट्टाहासाचा साराच एकंदर असंबद्ध मूर्खपणा?

14 comments:

Raj said...

सुंदर पोस्ट. हे प्रश्न एक्झिस्टेंशिअलिझ्मचे आहेत. त्यातलाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्वांचा अर्थ काय? दुव्यातले घड्याळ पाहून असे प्रश्न पडल्यावर एक्झिस्टेंशिअलिझ्मला काही लोक खिन्नता आणणारे तत्त्वज्ञान का म्हणतात याचा प्रत्यय येतो.

Meghana Bhuskute said...

खरंय. फार आशावादी माणसं बघितली, की मला ती खोटी खोटीच वाटायला लागतात. अधून मधून आशा-निराशा ठीक आहे.. पण यांच्या मते सगळं जग कसं गोड आणि सोपं. काहीही प्रश्न विचारला की यांचं काहीतरी उत्तर तयार... त्यांना खरंच तसं वाटत असतं की नाटक करतात स्वतःजवळपण कुणास ठाऊक.

a Sane man said...

मला वाटतं जर विरुद्ध दृष्टिकोणांमधली पोकळी भरून अर्थपूर्णता आणण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर थोडं वास्तववादी interpolation करावं - मधल्या सर्व values घेणारं. फक्त शून्य भरणं हा सोयीचा सोपा मार्ग आहे, नि म्हणूनच ती एक वास्तवापासून दूर जाण्याची पळवाट आहे. म्हणजे जर resampling करायचंच आहे तर शून्य भरून ते केल्याच्या खोट्या समाधानात जगायचं की अधिक वास्तववादी संख्या भरायच्या...मला वाटतं, zero padding सोपं असतं, पण तितकंच अधिक वास्तवापासून दूर नेणारं!

vidushi said...

I want to be thoroughly used up when I die, for the harder I work the more I live. I rejoice in life for its own sake. Life is no "brief candle" for me. It is a sort of splendid torch which I have got hold of for the moment, and I want to make it burn as brightly as possible before handing it on to future generations. -- George Bernard Shaw

Yashodhara said...

kharay Nandan.

The Toad said...

Hi nandan,
I read half of this quote on one of your blog posts, and i'm looking for the entire subhaashit.
'Utspatsyate hi kopi mama samaandhrma, kalorhyahyam nirawadhi vipula ch pritvi.'
if you have it, please send it to me!
(either on my blog, or on alokparanjape@gmail.com)

The Toad said...
This comment has been removed by the author.
The Toad said...

p.s.
Interesting post!
specially like the Pu la+ GA/ 2 idea!
Isn't it interesting how we define reality through fiction or a work of art that only hopes to reflect some part of reality! we are all narcissists in a way, our attempts at understanding life are simply attempts at understanding ourselves.

Vishakha said...

Hey नंदन! बरेच दिवसात तू काही नवीन लिहलेलं दिसत नाहियेस, तेंव्हा तुला मी खो देतेय! कशाचा? वाच संवेदच्या ब्लॉगवर...
http://samvedg.blogspot.com/

वाट बघू का मग पुढच्या पोस्टची :)

TheKing said...

I love this watch!
Well, after all life is how you see it. And how you see it, depends on how you are inherently built.
It's easy to say that Yudhishthir's brothers did not answer the questions correctly and hence died, but that doesn't mean that their perspective was wrong.

Quality Tale said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

सखी said...

वास्तव या दोन्ही टोकांच्या मध्ये असतं. या तुझ्या विधानावर दोन मिनीटं विचार केला आणि......पूर्णपणे सहमत!!!!

Monsieur K said...

absolutely splendid.. i especially loved the way u ended it :)

भानस said...

Atishay sunder post aahe. Nakalat manala aadhi anekda padlelech prashna fironi ekvar jaage zale, ase kahise ghadale.