Saturday, May 16, 2009

Monday, March 17, 2008

घटका, पळें...यक्षप्रश्न...झिरो पॅडिंग...असंबद्ध

एक चिवित्र घड्याळ. वेळ, जगाची लोकसंख्या, जन्म, मृत्यू...एवढंच नाही तर पृथ्वीचं वाढतं तपमान, घटणारी जंगले, वापरलं जाणारं खनिज तेल इ. दाखवणारे. दर सेकंदाला एक लग्न, एक गर्भपात आणि एक पंचमांश घटस्फोट होतो, ही माहिती(!) देणारं.

http://www.poodwaddle.com/clocks2.htm

हे लिहायला जेवढं वेळ लागला तेवढ्यात पन्नासेक जन्म, वीस-बावीस मृत्यू, थोडे अपघात, डझनावारी लग्नं, चार-पाच घटस्फोट,एक कॅन्सरग्रस्त, एखाद-दुसरी आत्महत्या इ. झाल्यात ही डिप्रेसिंग बातमी देणारा एक अजून ’नाऊ’ लिहिलेला टॅब.

ppp

युधिष्ठिराला ’जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?’ ह्या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक होतं (कठीण प्रश्नाला मराठीत आपण यक्षप्रश्न म्हणतो, ते यामुळेच). "जगात रोज अनेक मृत्यू आजूबाजूला पाहत असतानाही आपण अमर आहोत अशाच आविर्भावात माणसे जगतात", हे त्याचं उत्तर. इतर चार भावांना न आलेलं. कदाचित हे घड्याळ पाहून त्यांना सुचलं असतं, या प्रश्नाचं उत्तर. पण उत्तर माहीत नसल्याने बहुतेक ते अधिक सुखी असावेत. अज्ञानात सुख असतं तसं.

पण, सरसकट त्यांना अज्ञानी म्हणायला जीभ रेटत नाही. जग कितीही मोठं असलं तरी आपलं विश्व बव्हंशी आपल्यापुरतंच असतं. त्या अर्थाने दृष्टी थोडी मर्यादित ठेवावीच लागते. ’चिंता करतो विश्वाची’ हे रामदासांनीच म्हणणं ठीक. आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि ताऱ्यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच. इट्स अ वंडरफुल लाईफ मध्ये ख्रिसमस इव्हला आत्महत्या करायला निघालेल्या जॉर्ज बेलीला देवदूत येऊन त्याचं आयुष्य अगदीच वाया कसं गेलेलं नाही हे दाखवतो, तसं काहीसं. अर्थात, हे कधीकधी अगदीच फील-गुड होतं, हा भाग वेगळा.

पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बऱ्याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी. अर्धा भरलेल्या प्याल्याचं रुपक काय किंवा ’सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणत?’ काय - हे ओव्हर-सिम्प्लिफाईड वाटतं. म्हणजे सतत कोणी आशावादी गाणं म्हणणारा वगैरे राहिला, तर बोअर नाही का होणार?

वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतं म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार. डीएसपी म्हणजे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये एक झिरो पॅडिंग म्हणून संकल्पना आहे. दोन विरुद्ध टोकाच्या माहितीत शून्ये भरायची. [१,०,०,-१,०,०,०,०,१....] असं. शून्य = टोकाच्या दृष्टिकोनाचा किंवा एकंदरच अभाव, असं मानलं तर मग ही मालिका -- बराच वेळ काहीच न घडणारी, क्वचित वर-खाली होणारी -- हेच वास्तवाचं ’वास्तव’वादी वर्णन होऊ शकेल का? की हा आयुष्य सूत्रात बसवण्याच्या अट्टाहासाचा साराच एकंदर असंबद्ध मूर्खपणा?

Saturday, February 23, 2008

काही चित्रे, एक व्हिडिओ आणि एक बंगाली गाणं

काही हसरी तर काही हास्यास्पद चित्रे --

कन्याशाळा


सनातन प्रभात


ब्रेकिंग न्यूज


उत्क्रांती


शिवाय ’ओ सजना’ ची लताबाईंनीच गायलेली ही बंगाली आवृत्ती

आणि यूट्यूबवर सापडलेला एक सुरेख व्हिडिओ

Monday, January 07, 2008

वन - लाईनर :)

If it weren't for my lawyer, I'd still be in prison. It went a lot faster with two people digging.
- Joe Martin

Sunday, December 30, 2007

जुळल्या सुरेल तारा...

'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातला हा प्रसंग आज अचानक यूट्यूबवर सापडला. 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' ही दोन्ही सुरेख गाणी या प्रसंगात आहेत. त्यापैकी 'थकले रे नंदलाला'आशाच्या आवाजात आपण अनेकदा ऐकलं असेल; परंतु या चित्रफीतीत हे गाणं राजाभाऊ परांजपे (बाबूजींच्या आवाजात) सीमाला (आशा) शिकवत आहेत, असा एक सुरेल प्रसंग आहे - तो यापूर्वी कधी पाहण्यात आला नव्हता.

'थकले रे नंदलाला' वर जाणारी बाबूजींची 'वाहवा' अशी दाद, 'निलाजरेपण कटीस नेसले' ही ओळ दुसर्‍यांदा आशाने बरोबर उचलल्यावर येणारं 'बहोत अच्छे', या आणि पुढच्या ओळींत 'सूर जुळणं' म्हणजे काय असतं याचं मिळणारं प्रात्यक्षिक, सूरदासांच्या 'अब मैं बहुत नाचों गोपाल' चे गदिमांनी केलेलं अप्रतिम मराठीकरण आणि मग धुमाळच्या थोड्या खटकेदार संवादांनंतर येणारं 'बाई मी विकत घेतला श्याम' -- एवढं सारं या चित्रफीतीत आहे. अर्थात हे सारं ढोबळ वर्णन. खरा आनंद घेण्यासाठी ही चित्रफीत पहा. नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

Wednesday, December 12, 2007

बिली कॉलिन्सच्या ऍनिमेटेड कविता/तू माझी माऊली

अजून एक व्हिडिओ. बिली कॉलिन्सच्या कवितांचा. यातली चित्रं पाहून, पुलंच्या तू माझी 'माऊ'ली मधल्या - हाती मशाली घेऊन मांजरीच्या घरावर 'दार उघड बया' म्हणून गेलेल्या उंदराच्या मोर्चाचं (आणीबाणीवरील रूपक) चित्र आठवलं.



बिली कॉलिन्सच्या इतर कवितांच्या ऍनिमेशनसाठी येथे पहा.

कोंबड्यांची झुंज

कोंबड्यांची झुंज हा अमानुष प्रकार आहे, असं माझं (नेहमीप्रमाणेच ठाम)मत आहे. हे चलच्चित्र पाहून त्यातील अ-मानुषता अधिकच 'टोचते'. तुमचं काय मत यावर? :)

Thursday, December 06, 2007

टप्प्याचे महत्त्व (पी. जे.)

'पन'कार अजितपासून प्रेरणा घेऊन, सुचलेलं हे पी.जे. - कम - कोडं :-

नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही.

खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले. वेगवान गोलंदाजाचे ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू सोडून द्यायचे आणि फिरकी गोलंदाजाचे मोहात पाडणारे फुल लेन्ग्थ किंवा हाफ व्हॉलीवरचे चेंडू केवळ तटवायचे. वीरु 'हो' म्हणला.

दुसर्‍या दिवशी सराव सामना होता. पियुष चावलाने उंची दिलेल्या चेंडूवर सेहवाग क्रीज सोडून पुढे आला आणि मिडविकेटला झेलबाद झाला. "तुला मी हज्जारदा सांगितलं होतं, पण ऐकू नकोस." ('सेहवाग की माँ' सेहवाग को याद आयी. तीही लहानपणी अशीच करवादायची.) डोईवरचे नसलेले केस उपटायचा प्रयत्न करत गॅरी म्हणाला. "आता काय सांगितलं, कसं सांगितलं की तू अशी चूक पुन्हा करणार नाहीस?"

योगायोगाने नव्वदी ओलांडलेले दुबेबुवा तिथे हजर होते. ते पुढे आले आणि गॅरीला म्हणाले; "आता जरी मी थकलो असलो, मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले. वीरूचा एरवी थोडा मठ्ठ दिसणारा चेहरा उजळला. पुढच्या एकाही सामन्यात वीरूने ती चूक पुन्हा केली नाही.

काय म्हणाले असतील दुबेबुवा? (उत्तर आणि अवांतर दुव्यासाठी कृपया माऊसने खालील कोरा भाग निवडावा/हायलाईट करावा.)

उत्तर - फुल गेंदवा अब ना मारो
अवांतर -- मालिनीबाई राजूरकरांनी गायलेली ही भैरवी येथे ऐकता येईल.