Saturday, November 25, 2006

बालादपि...

मी १२-१३ वर्षांचा असताना एका नातेवाईकाने 'तो सचिन तेंडुलकर बघ -तुझ्यापेक्षा फक्त ७-८ वर्षांनीच मोठा आहे, पण कुठे पोचलाय!', असे काही कारण नसताना डिवचले होते. शहाणा मुलगा असल्याने 'तुमच्यापेक्षा तो जवळजवळ १५-२० वर्षांनी लहान आहे, तरी पहा...' या चालीवर उत्तर द्यायचे टाळले होते. हल्लीच सचिन-कांबळीचा ६६४ धावांचा विक्रम एका शाळकरी दुकलीने मोडला, त्यावरुन हे आठवलं.

पण हे पोस्ट क्रिकेट किंवा आगाऊ नातेवाईकांबद्दल नाही. आहे ते लहानग्या वयातच 'वय लहान पण कीर्ती महान' असणाऱ्या young achievers/child prodigies च्या वाढत्या संख्येबद्दल. पूर्वी सचिनचे अप्रूप होते. पण आता बघाल तर १८-२० व्या वर्षी राष्ट्रीय संघात असणे काही नवलाईचे नाही. रूद्रप्रताप सिंगची कामगिरी कशीही असो, विशीत असतानाच तो संघात आहे. राफाएल नडालचे वय २०, फेडररचे २५. सानिया जेमतेम २०, शारापोव्हा १८ ची आणि अनेक इतर 'व्हा' [कुझ्नित्सोव्हा, पेट्रोव्हा, देमेन्तिएव्हा] विशीच्या आसपासच्या. अमेरिकन फूटबॉलमधले पण रॉथलिस्बर्गर, रिवर्स, टॉमलिन्सन, ड्र्यू ब्रीज पण सगळे पंचविशीच्या आत-बाहेरचे. फूटबॉलमध्ये पण क्रिस्टिआनो रोनाल्डो, वेन रुनी विशीतले तर रोनाल्डिनिओ व इतर पंचविशीतले. बुद्धिबळातही गेल्या ४-५ वर्षांत सर्वात लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम ५-६ वेळा तरी तोडला गेला असेल. त्यामुळे दिवसेंदिवस आपण इतके निर्ढावत चाललो आहोत, की त्यातून धक्का द्यायला ओरिसातला एखादा ३ वर्षांचा मुलगा मॅरॅथॉन पूर्ण करतो सारखी टोकाची बातमी लागते.

अचानक सगळीकडे हे achievement चे वय कमी व्हायचे कारण काय? लहान वयातच वाढलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करुन घ्यायची जीवघेणी धडपड? आणि हे यश मिळवण्याचे वय कमी होत होत होणार तरी किती? 'पूर्वी कायम भरतीच होती आणि आत्ताच्या पिढीत कायम ओहोटीच आहे', अशी टीका प्रत्येक आदली पिढी करत असताना या नव्या trend ला काय म्हणावे?

1 comment:

Anonymous said...

हो ना! त्या ३ वर्षांच्या मुलाबद्दल ऐकून मी पण चक्रावून गेले होते! हल्ली देशात लहान लहान तिसरी-चौथीतीतली मुलंदेखिल किती वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याच्या 'क्लासेस'ना जात असतात. आपण उनाडक्या करत आपलं बालपण वाया घालवलं की काय असा प्रश्न पडतो यांच्याकडॆ पाहून!आणि शाळेत बऱ्यापैकी मार्कं पाडत एक एक इयत्ता पुढे जायचं, मग कॉलेज, उच्च शि़क्षण, नोकरी असा normal cousre follow करणं... कुठलीही outstanding achievement न करता, हे दुर्मिळ होत जाणार आहे की काय दिवसेंदिवस?? उद्या आपली मुलं आपल्याला "हे काय आई... तुला एकही Gold Medal नाही मिळालं कधीच???" म्हणून Complex तर नाही देणार ना? :D