Sunday, January 21, 2007

झुंडशाही

लोकसत्तेचे संपादक श्री. कुमार केतकर यांनी परभणी येथील अ. भा. बहुभाषिक ब्राह्मण सभेच्या महाअधिवेशनात केलेले बीजभाषण येथे वाचता येईल. भाषण नक्कीच वाचनीय आहे, आणि सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात जुन्या व्याख्या मोडून नवीन ठरवल्या पाहिजेत असा विचारही त्यात मांडला आहे. दुर्दैवाने त्यांचे काही विचार न पटल्याने त्यांच्या भाषणाच्या वेळी घोषणाबाजी करणे, गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकार झाले.

समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील ब्राह्मणांची (तथाकथित) मक्तेदारी मोडीत निघाल्यात जमा आहे, किंवा जी काही आहे ती मोडीत काढण्याची भाषा होत असते. आता हुल्लडबाजीत तरी आपण मागे राहू नये, असे तर दुर्दैवाने या समाजातील काही घटकांना वाटत नाही ना?

वैचारिक दहशतवाद हा कुठल्याही जाती-धर्माच्या माणसाने पसरवण्याचा प्रयत्न केला तरी तो तितकाच निषेधार्ह आहे, हे जरी खरे असले तरी झालेला हा प्रकार म्हणजे et tu, Brute? स्वरुपाचा वाटला, हे व्यक्त झालेल्या यासारख्या प्रतिक्रियांवरून दिसून येते.

3 comments:

Priyabhashini said...

समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील ब्राह्मणांची (तथाकथित) मक्तेदारी मोडीत निघाल्यात जमा आहे, किंवा जी काही आहे ती मोडीत काढण्याची भाषा होत असते. आता हुल्लडबाजीत तरी आपण मागे राहू नये, असे तर दुर्दैवाने या समाजातील काही घटकांना वाटत नाही ना?

नंदन, हे तुझे जहाल विचार पहिल्यांदाच वाचले. :)
असो. केतकरांच्या भाषणावर हुल्लडबाजी अपेक्षितच आहे. काही माणसांना बदलांची भीती वाटते. जे चालत आले आहे ते डोळे झाकून तसेच राहावे त्यापेक्षा वेगळा विचार म्हणजे अध:पतन अशी विचारसरणी करून ठेवलेल्या समाजाला दलितांप्रमाणेच "वर" आणण्याची गरज आहे.

Anonymous said...

केतकरांच्या भाषणात काही आक्षेपार्ह वाटले नाही.
हल्ल्याचा प्रकार निषेधार्हच आहे.

Anonymous said...

" समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील ब्राह्मणांची (तथाकथित) मक्तेदारी मोडीत निघाल्यात जमा आहे "
वरील क्षेत्रांत ब्राह्मणांची मक्तेदारी आहे असे विधान कुठे पाहायला मिळते ? परभणी सभास्थानी केतकरांच्या भाषणांतील कोणती वाक्ये लोकांच्या रोषास पात्र झाली वा कोणत्या वाक्यांवर आक्षेप घेण्यात आला, लोकांनी राग कशा प्रकारे व्यक्त केला, आणि ते लोक कोण होते ह्याची आणखी कोठेच माहिती पहायला मिळाली नाही. ब्राह्मणांनी हुल्लडबाजी केली ? का पब्लिसिटी स्टंटसाठी केतकरांनीच हुल्लडबाजी घडवून आणली हेही आधी तपासायला हवे. "ब्राह्मण प्राचीन काळी काय करत होता आणि त्याने त्याकाळी कुणाचा किती छळ केला" हे उगाळत बसणे हा विषयच मुळात आपली महता वाढविण्याचा एक प्रयास म्हणून बरेच ठिकाणी दिसून येतो. पण अशा ऐतिहासिक गोष्टींचे आज महत्त्व किती ? आणि अशा विधानांची कोणी वाहवा नाही केली की "माझे आधुनिक विचार ब्राह्मणांच्या गळी उतरत नाहीत" म्हणून आपणच बोंब उठवायची. आपले उठसुठ "ब्राह्मण म्हणजे समाजाचे शोषण करणारा वर्ग" अशी त्यांची प्रतिमा रंगवायची ही एक फॅशन झाली आहे. पुण्यातील भाव्यांचे संमेलन एकही संयुक्तिक कारण नसतांना उधळून लावल्याचा अभिमान आणि आनंद प्रदर्शित करणाऱ्यांनी आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा कांगावा करावा ?
"मी जन्माने नव्हे तर विचाराने ब्राह्मण आहे" असे सुचित करून, सामान्य जनांवर भावनिक आघात करून आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे ह्याला वैचारिक शुद्धता म्हणता येणार नाही ही तर वैचारिक "शूद्र" वृत्ती झाली.