Thursday, September 27, 2007

उगवला...चंद्र सुगीचा

Harvest Moon
[आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र]

आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल. मोल्सवर्थच्या शब्दकोशात 'विसुपद' आणि 'ससद्भक्रांतिपथ' असे काही अर्थबोध न होणारे प्रतिशब्द आहेत.) या ऑटम्नल इक्विनॉक्सच्या सर्वात जवळ जी पौर्णिमा येते, तिला हार्वेस्ट मून म्हणतात. या हार्वेस्ट मूननंतर जी पौर्णिमा येते, ती 'हंटर्स मून' म्हणून ओळखली जाते. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत.

हार्वेस्ट मूनचे महत्त्व थोडे वेगळे आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी, सूर्यास्त आणि चंद्रोदय साधारण एकाच वेळी होतात. पण मग जसजसा कृष्णपक्ष सुरु होतो आणि चंद्राची कोर लहान लहान होत जाते तसतसा सूर्यास्त आणि चंद्रोदयाच्या वेळेत फरक पडत जातो. संपूर्ण वर्ष विचारात घेतले, तर प्रत्येक दिवशी हा फरक सरासरी ५० मिनिटांचा असतो. उत्तर गोलार्धात, डिसेंबर - जानेवारीच्या सुमाराला हा फरक सर्वाधिक म्हणजे साधारण ७० मिनिटांचा असतो. म्हणजे, जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. [कृपया तक्ता पहा.]

याचाच अर्थ सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो.

गेल्या पौर्णिमेला प्रथमच पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले होते. त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) आज हार्वेस्ट मून पाहिला. आता एका महिन्याने कोजागिरी. अगदी 'नवीन आज चंद्रमा...' किंवा This moon just one म्हणावं, असे चांद्र-योग!

[अवांतर - पौर्णिमेचा चंद्र उगवताना कधीकधी आहे त्या आकारापेक्षा बराच मोठा का दिसतो, याचं स्पष्टीकरण येथे वाचता येईल.]

लेखासाठी संदर्भ --
१. http://spaceweather.com
२. http://science.nasa.gov/headlines/y2000/ast11sep_2.htm

4 comments:

संदीप चित्रे said...

Hi Nandan,
Good to found you. I think you left a comment on my blog 'www.atakmatak.blogspot.com' for the article 'bittambaatamee', right?
Sandeep

Nandan said...

hoy sandeep, meech to :)

TheKing said...

Now this is some cool information!!

HAREKRISHNAJI said...

आयी चांदनी रात शरदकी