Saturday, November 03, 2007

एस. डी. - लताची पाच सर्वोत्कृष्ट गाणी

गेल्या महिन्यातच एस. डी. बर्मन यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. हिंदी चित्रपट-संगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल, अशा पन्नास ते सत्तरच्या दशकांत एस. डी. आघाडीचे संगीतकार होते आणि लताबाई आघाडीच्या पार्श्वगायिका. यूट्यूबवर भटकताना एस. डीं. नि संगीतबद्ध केलेली आणि लताबाईंनी गायलेली काही गाणी सापडली, त्यातलीच आवडती पाच येथे देत आहे. कृपया केवळ स्मरणरंजन म्हणूनच या लेखाकडे पहावे, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही.

१. तुम न जाने किस जहाँ में खो गये

लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा. विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय-न होतोय असा हळुवार उच्चार आणि तीनवेळा वाढत्या उत्कटतेने येणारा 'तुम कहाँ?' चा सवाल.



२. फैली हुई है सपनोंकी बाहें

'तुम न जाने...' गायलेल्या गायिकेनंच हे गाणं म्हटलंय का, असा प्रश्न पडावा इतका यात लताबाईंचा आवाज वेगळा लागलाय. रॉबर्ट ब्राऊनिंगची 'पिपाज साँग' म्हणून एक प्रसिद्ध कविता आहे. या गाण्याच्या एकंदर आनंदी आणि (भरपेट पुरणपोळीच्या जेवणानंतर यावा तशा) निवांत मूडमुळे त्या कवितेतल्या 'गॉड इज इन द हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' [आठवाः चितळे मास्तर] या ओळींची आठवण आल्यावाचून राहत नाही.

साहिरचे शब्द, लताचा केवळ 'स्वर्गीय' म्हणावा असा आवाज आणि त्याला साथ देणारं, गाण्यावर कुठेही अतिक्रमण न करणारं एस. डीं. चं संगीत. आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा काय किंवा गाण्यात सुरुवातीला केवळ चारच सेकंद (००:१६ ते ००:२०) वाजणारा सतारीचा सुंदर तुकडा काय, केवळ अप्रतिम. [फक्त कल्पना कार्तिक ऐवजी या गाण्यात मधुबाला असती तर किती बहार आली असती :)].

वैताग, कंटाळा आला असताना डोळे मिटून हे गाणं ऐकावं आणि 'और सभी गम भूलें' चा प्रत्यय घ्यावा.



३. जायें तो जायें कहाँ

'टॅक्सी ड्रायव्हर' मध्ये तलतने म्हटलेल्या या गाण्याची लताने म्हटलेली आवृत्ती मला तितकीच आवडते. दर्दभरी, दुःखी मूडची गाणी म्हणण्याचा प्रत्येक गायकाचा एक वेगळा ढंग असतो, आणि त्यात त्या त्या गायकाचे व्यक्तिमत्वही डोकावत असतं असं मला वाटतं. बंदिनीमधलं 'अब के बरस भेज भय्या को बाबुल' हे आशाचं बावनकशी, काळजाला हात घालणाऱ्या दुःखाचं गाणं आणि लताची या गाण्यासारखीच दुःखी पण संयत हतबलता व्यक्त करणारी 'उठाये जा उनके सितम' किंवा अगदी पूर्वीचं 'साजन की गलियाँ छोड चले' सारखी गाणी यात हा फरक जाणवतो.

एकीचं दुःख, तिच्या व्यक्तिमत्वासारखंच थेट, हृदयाला पिळवटून टाकणारं तर दुसरीचं बहुधा लहानपणीच अंगावर पडलेल्या जबाबदारीतून आलेल्या अकाली प्रौढत्वामुळे गंभीर, संयत आणि 'समझेगा कौन यहाँ' म्हणणारं. लता आणि आशात श्रेष्ठ कोण, हा वाद बराच जुना आहे. त्यावर काही भाष्य करण्याचा या लेखाचा उद्देशही नाही. पण या वादात आशाकडे अधिक वैविध्य आहे असं सरसकट विधान करताना या शैलीतल्या फरकाकडे बऱ्याचदा लोकांचं दुर्लक्ष होतं, असं खुद्द आशाच एका कार्यक्रमात म्हणाली होती. (पांडुरंग कांती हे गाणं जर दीदीने गायलं, तर ती त्यातले आलाप/ताना कमीत कमी ठेवून कसं म्हणेल हे प्रात्यक्षिक म्हणून गाऊन दाखवल्यानंतर.)

असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :).



४. मोरा गोरा अंग लई ले

बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातली इतर गाणी जरी शैलेंद्रने लिहिली असली, तरी हे एकच गाणं गुलझारने लिहून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत गुरुवारी रंग-तरंग म्हणून पुरवणी यायची. त्यात एकदा गुलजारला नायिका आपल्याला त्रास देणाऱ्या चंद्राला राहूचे भय दाखवते ही कल्पना खूप दिवसांनी, गाण्याची दोन कडवी मनाजोगती होऊनही गाण्याची पूर्तता कशी करावी या विवंचनेत काही दिवस घालवल्यावर कशी सुचली याचं वर्णन केलं होतं. दुर्दैवाने त्याचे तपशील आता आठवत नाहीत. परंतु, गीतांतून बऱ्याचदा डोकावणारा चंद्र आणि 'कुछ खो दिया है पाईके, कुछ पा दिया गँवाई के' सारख्या ओळी म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसण्यासारखंच असावं.

'पुत्रवती बभूव' झाल्यानंतर (मोहनीश बहल) नूतनचा हा पहिलाच चित्रपट. मर्ढेकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर, तिचा चेहरा गर्भवतीच्या 'सोज्वळ मोहकतेने' पडदा उजळवून टाकतो. रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री.

या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, लता आणि एस. डी. बर्मन यांच्यात निर्माण झालेला काही काळापुरता बेबनाव मिटवून, दोघांनी पुन्हा एकत्र काम करणं सुरू केल्यानंतर आकाराला आलेलं हे पहिलंच गाणं.



५. पिया बिना

अभिमान हा एस. डीं. च्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक. त्यातली सगळीच गाणी सुरेख आहेत, यात वादच नाही. पण हे एस. डी. - लता जोडगोळीच्या कारकीर्दीचं प्रातिनिधिक गाणं वाटतं. या चित्रपटाच्या आसपास, म्हणजे सत्तरच्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलालनी अनेक वाद्यांचा ऑर्केस्ट्रा लोकप्रिय केला होता. त्याच्या तुलनेत, या गाण्यातली बासरी-तबल्याची साथसंगत हे एस. डीं. चे वैशिष्ट्य म्हणता येईल. किमान वाद्यांनी गाण्याचा मूड पकडण्यातले कौशल्य आणि गायकाला दिलेला पूर्ण स्कोप. कदाचित, त्यामुळेच त्यांची बरीच गाणी लताची, रफीची, आशाची म्हणून अधिक प्रसिद्ध झाली असावीत.



या यादीत गाईड, ज्वेल थीफ मधली गाणी; 'चांद फिर निकला', 'मेघा छाये आधी रात', 'रात का समाँ', 'रंगीला रे' ही गाणी नाहीत. शिवाय, एस. डीं. ची इतर गायिकांनी म्हटलेली 'वक्त ने किया' (गीता दत्त), 'अब के बरस भेज' (आशा) आणि 'ना तुम हमें जानो' (सुमन कल्याणपूर) ही गाजलेली गाणीही नाहीत. पण कुठलीही यादी सर्वानुमते ठरणे जसे अशक्य आहे, तसेच याचेही म्हणता येईल.

संदर्भ -

१. http://www.imdb.com/name/nm0005984/
२. http://www.rediff.com/entertai/2002/feb/28dinesh.htm
३. http://www.gulzaronline.com/
४. http://www.geetmanjusha.com/hindi/musician/8.html

13 comments:

Meghana Bhuskute said...

मस्तच झालाय लेख. निवांत आठवणी चघळाव्यात तसा मूड.

Tulip said...

क्या बात है नंदन! .. एस्डी-लता कॊम्बिनेशनची अगदी चुनके गाणी निवडली आहेस.
मोरा गोरा तर खास. बंदिनी मधे नूतन बोटीतून उतरुन धावत जाते त्यावेळी तिच्या चेहर्यावर ते अंधार उजेडाचे कवडसे कसले टिपलेत नां?
आता सध्या मला वेळच वेळ आहे तेव्हां हा असला एखादा टॆगच सुरु करुयात अजून. what say?:)))
फ़ैली हुई है.. ह्या पाच गाण्यांत घेऊन दिल खुश करुन टाकलस बाकी:D. सगळंच पोस्ट मस्तं झालय.

Raj said...

गाणी सुंदर आहेतच, पण त्यांचे वर्णनही सुरेख केले आहेस. लेख आवडला. मला एसडींच्या आवाजातली गायलेली गाणीही बेहद्द आवडतात. त्यातलच एक, वहां कौन है तेरा.

सर्किट said...

ऐल्ला, मस्त जमलये पोस्ट. मजा आली वाचून! लता आणि एस्डी - खास जोडी निवडलीयेस. ट्युलिपची ऐडिया चांगलीये. ट्यू, तूच घे खो, आणि लिही ह्या सेरीजचा पार्ट टू. आम्ही नक्की वाचू! :-D

Meghana Bhuskute said...

झाडून सगळी मित्रमंडळी आज भेटतात, त्यात यंदा तुम्हीपण. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Vaidehi Bhave said...

!!! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

HAREKRISHNAJI said...

सुरेल लेख.
साजन की गलीया हे माझ्या आवडीचे गाणे पाहुन व ऐकुन सुखद धक्का बसला.

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

सर्किट said...

अरे आज अचानक वाचायला मिळालं हे पोस्ट! छान लिहीलंयेस, आणि गाणीही चांगली सिलेक्ट केलीयेस. जाणकारांनी खो घेऊन सिक्वेल्स लिहायला काहीच हरकत नसावी. :)

पूनम छत्रे said...

waah! mast gaani aahe sagali.. tyaalaa vdos chi jod deoon agadi 'tya jamanyat' gheoon jata :)

btw, maybili diwali ank awadalyache sangitlyabaddal thanks! :)

a Sane man said...

sahich...tuzya prtyek gaNyavarachya Tipahi mast...

"mora gora anga" maza ek all time favorite aahe...mast zalay lekh...

A woman from India said...

काल माझ्या कुठल्या लेखावर प्रतिक्रिया दिली होतीत? मी प्रसिद्ध केली, पण नंतर सापडलीच नाही.
ता.क.:हा ब्लॉग फार छान जमतोय. आत्ता घाईत आहे. सावकाशीने वाचीन.

Anonymous said...

mast! ullekh keleli sagalich gaani aikleli nahit. pan ata varnan vachun aikanyachi icchaa nirman zali aahe.

Nandan said...

Ganyanvishayi mee kadhi lihen asa vaaTala navhata :), tumachya pratisadanbaddal aabhari aahe.