Sunday, December 30, 2007

जुळल्या सुरेल तारा...

'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातला हा प्रसंग आज अचानक यूट्यूबवर सापडला. 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' ही दोन्ही सुरेख गाणी या प्रसंगात आहेत. त्यापैकी 'थकले रे नंदलाला'आशाच्या आवाजात आपण अनेकदा ऐकलं असेल; परंतु या चित्रफीतीत हे गाणं राजाभाऊ परांजपे (बाबूजींच्या आवाजात) सीमाला (आशा) शिकवत आहेत, असा एक सुरेल प्रसंग आहे - तो यापूर्वी कधी पाहण्यात आला नव्हता.

'थकले रे नंदलाला' वर जाणारी बाबूजींची 'वाहवा' अशी दाद, 'निलाजरेपण कटीस नेसले' ही ओळ दुसर्‍यांदा आशाने बरोबर उचलल्यावर येणारं 'बहोत अच्छे', या आणि पुढच्या ओळींत 'सूर जुळणं' म्हणजे काय असतं याचं मिळणारं प्रात्यक्षिक, सूरदासांच्या 'अब मैं बहुत नाचों गोपाल' चे गदिमांनी केलेलं अप्रतिम मराठीकरण आणि मग धुमाळच्या थोड्या खटकेदार संवादांनंतर येणारं 'बाई मी विकत घेतला श्याम' -- एवढं सारं या चित्रफीतीत आहे. अर्थात हे सारं ढोबळ वर्णन. खरा आनंद घेण्यासाठी ही चित्रफीत पहा. नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

No comments: