भौगोलिक परिभाषेप्रमाणे तेरेखोल संपूर्णपणे महाराष्ट्राने वेढलेले आहे हे म्हणणे बरोबर नाही. तेरेखोल हा तेरेखोलच्या खाडीच्या उत्तरेकडे असलेला गोव्याचा एकमेव भूभाग आहे. सागरमार्गाने तो गोव्याशी संबद्ध आहे. अंजदीव हे बेट गोव्यात समाविष्ट असले तरी कर्नाटकातील कारवार बंदराच्या अगदी सन्मुख आहे. वास्तविक तेरेखोल महाराष्ट्रात आणि अंजदीव कर्नाटकाला जोडले तर तिथल्या रहिवाशांचा बराच त्रास वाचेल.
स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारत आणि संस्थानांचे प्रदेश एकमेकांत गुंतलेले होते. कोल्हापूर, औंध या संस्थानांची बरीच खेडी इतरत्र विखुरलेली होती. ब्रिटिश भारतातील बार्शी आणि जामखेड हे तालुकेच निजाम संस्थानाने वेढलेले होते. निजामाच्या रायचूर जिल्ह्यातील गंगावती भाग विजापूर जिल्ह्याने वेढलेला होता, तर आंध्र (त्यावेळचा मद्रास) प्रांतातील अंगोल हा तालुका निजाम संस्थानाने वेढलेला होता. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर प्रदेशांची अदलाबदल करून व्यवहार सुरळीत करण्यात आला. भारतात ब्रिटिश पंजाबमधील सिमला आणि डलहौसी ही गावे हिमाचल प्रदेशाने वेढलेली होती. (पंजाबात असूनही हिमाचल प्रदेशचे मुख्यालय सिमल्यात होते.) पंजाबमधून हिमालय वेगळे करताना कुलू हा पहाडी जिल्हा (डलहौसीसहित), तसेच सिमला हिमाचल प्रदेशात विलीन करण्यात आले.
दक्षिणेतील पदुचेरी (पाँडिचेरी) हे राज्य तर १२ तुकड्यांचे बनलेले आहे. मुख्य पदुचेरी, कारिकल हे तुकडे तमिळनाडूत, यानाम आंध्र प्रदेशात, तर माहे केरळमध्ये आहे. पुन्हा माहेचे दोन तुकडे आहेत. खुद्द पदुचेरीचे १० तुकडे विखुरलेले आहेत. पण गोव्याप्रमाणे सांस्कृतिक वेगळेपणाच्या अभिनिवेशामुळे पदुचेरीचे लोक आपले राज्य विसर्जित करण्यास तयार नाहीत.
राज्यांप्रमाणे देशादेशांतही असे भूवेष्टित प्रदेश आहेत. पहिले उदाहरण भारताचेच. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाले तेव्हा जिल्हे, खेडी यांची अदलाबदल करण्यात आली. पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश)ला आसामचा सिल्हेट जिल्हा जोडण्यात आला. उत्तर बंगालमधील कुचबिहार हे संस्थान १९४८ पर्यंत ना भारतात समाविष्ट झाले होते, ना (पूर्व) पाकिस्तानात. तेव्हा कुचबिहारची काही खेडी पूर्व पाकिस्तानात गेलेल्या प्रदेशात होती, तर पूर्व पाकिस्तानची काही खेडी कुचबिहारी संस्थानाने वेढली होती. १९४८ मध्ये कुचबिहार भारतात सामील झाले, तेव्हा विभागांची पुनर्रचना होऊन गेली होती. अजूनही ही खेडी परिवेष्टित असून वादाचे कारण बनली आहेत.
१९४८ साली इस्त्रायलची निर्मिती होत असताना जेरुसलेम हे शहर अरब आणि ज्यूंच्या अस्मितेचा प्रश्न बनले होते. ज्यूंनी नवे जेरुसलेम जिंकून घेतले, पण जुने शहर अरबांच्याच ताब्यात राहिले. त्यातही जुन्या जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठ असलेली टेकडी ज्यूंनी अरबांच्या ताब्यात जाऊ दिली नाही. १९६७ मध्ये ज्यूंनी जेरुसलेमसहित पश्चिमी किनारा प्रदेश जिंकून घेतल्यावर जुने जेरुसलेम, नवे जेरुसलेम आणि झिऑन टेकडी एकत्र करून ग्रेटर जेरुसलेम म्हणून एकत्रीकरण करण्यात आले. भूवेष्टित नव्हे तरी तेरेखोलप्रमाणेच स्थिती असलेले ग्वादर हे बंदर आहे. अरब द्वीपकल्पातील ओमान या संस्थानाच्या मालकीचे ग्वादर नावाचे एक मच्छिमारी खेडे खाडीच्या दुसऱ्या बाजूवर पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या किनाऱ्यावर होते. हे खेडे विकत घेऊन पाकिस्तान तिथे चीनच्या सहाय्याने मोठा आरमारी तळ उभारत आहे. १७ व्या शतकात फ्रान्स आणि स्पेनची सरहद्द पिरिनीज पर्वताच्या मधून आखण्यात आली. यावेळी गावांच्या याद्यांची अदलाबदल करताना फ्रान्समध्ये समाविष्ट करावयाच्या खेड्यांपैकी एक नाव विसरुन राहिले. आजही हे फ्रेंच भूवेष्टित खेडे स्पेनचा भाग आहे.
-- सुधाकर डोईफोडे.
(आजच्या लोकरंगमधील प्रतिक्रियेतून)
[अशीच भूगोलाबद्दल रंजक माहिती येथे वाचा.]
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
माहितीपूर्ण ! आवडला.
ranjak mahiti aahe. maja ali vachun. :)
for a moment ... i felt like i am sitting in good'ol geography class :-)
there is so much about India to know! you made me feel that again!
vaidehi, anamika, rohit -- aapalya pratikriyanbaddal aabhari aahe.
Post a Comment